लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. यावेळी अन्य मागण्यांचे पत्रही त्यांच्याकडे देण्यात आले.
गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून काेकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. सध्या या मार्गावर अधिक तिकीट असलेल्या विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवाशांना साेयीच्या ठरणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे प्रवास तिकीट व प्लॅटफॉर्म तिकीट यामध्ये केलेली मोठी वाढ त्वरित मागे घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री व खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, खासदार संजय मंडलिक, खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.