रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न घेता वर्षभरात घेण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील २१ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दरवर्षीप्रमाणे पुन्हा विज्ञान, वाणिज्यसह शहरांमधील दर्जेदार महाविद्यालयांकडील कल वाढणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात अनुदानित ६१, विना अनुदानित ५१, स्वयंअर्थसहाय्यित २९ महाविद्यालयांचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकरावीच्या विविध शाखांमधील जागा अधिक आहेत. मात्र, अंतर्गत मूल्यमापनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा टक्का अधिक आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य या दोन शाखांसाठी प्रवेश मिळविण्यासाठी ओढा वाढणार आहे. गतवर्षी ७५ टक्क्यांवर विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. मात्र, यावर्षी ती जास्त गुणांवर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी गुणांचा आलेख वाढण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात अनेक कनिष्ठ महाविद्यालये असून, भविष्यातील संधीच्या दृष्टीने बहुतांश पालकांचा पाल्याला शहरातील, तालुका किंवा जिल्ह्यातील दर्जेदार महाविद्यालयांत प्रवेश घेण्यावर भर देत असल्याने नावाजलेल्या महाविद्यालयांकडे प्रवेशासाठी ओढा वाढत आहे. परिणामी महाविद्यालयीनस्तरावर प्रवेशासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.