लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : गुहागर तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी तहसीलदार लता धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या गुहागर तालुक्यात महा ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना जातीचा, उत्पन्नाचा व इतर तत्सम दाखले महा ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय बंद असल्यामुळे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. शासनाकडून कोरोनाचे निर्बंध थोड्याफार प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. शासनाच्या कोरोना संदर्भातील नियम व अटींचे पालन करून महा ई - सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी अध्यक्ष राजेश शेटे, तालुका महिला विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर, सोपविल कांबळे, दिनेश निवाते, नितीन कारकर, कौस्तुभ कोपरकर, ऋतिक गावनकर, मयूर शिगवण उपस्थित होते.
-------------------------
गुहागर तालुक्यातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनाेद जानवलकर यांनी तहसीलदार लता धाेत्रे यांच्याकडे निवेदन दिले.