राजापूर : तालुक्यातील तुळसुंदे या मच्छिमारी बंदराकडे जाणारा रस्ता कित्येक वर्षांपासून खराब झाला होता. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. अखेर आमदार राजन साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ मच्छिमार नेते पर्शुराम डोर्लेकर यांच्या हस्ते झाला आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना
मंडणगड : कोरोनाच्या अनुषंगाने तालुक्यात शिमगोत्सव शांततेत साजरा केला जावा, या उद्देशाने येथील महसूल आणि पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उत्सव काळात कोरोना संबंधीच्या नियमावलीचे पालन केले जावे यासाठी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामरक्षक कृतीदलाच्या सदस्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
कॅटरिंग व्यवसाय अडचणीत
चिपळूण : लग्नसोहळ्यासाठी ५० माणसांच्या असलेल्या मर्यादेमुळे विवाह सध्या मंगल कार्यालयांमध्ये होण्याऐवजी घरगुती पद्धतीने करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातून जेवणाचा मेनू गायब झाला असल्याने कॅटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.
शिमगोत्सव साधेपणाने
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील निवासिनी श्री वाघजाई, श्री नवसारी व जाखमाता देवीचा शिमगोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होतो. मात्र, यावर्षी हा शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे.
वीजपुरवठा अनियमित
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित झाला असून सातत्याने खंडित होत आहे. सध्या उकाडा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. असे असताना सतत विजेची ये-जा सुरू असते. त्यामुळे पंखे बंद रहात असल्याने उकाड्याचा त्रास अधिक होऊ लागला आहे.
वीज कनेक्शन तोडले
देवरुख : थकीत बिलाची रक्कम वेळेवर न भरल्याने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील सायले, बेलारी आदी गावातील बीएसएनएलच्या टॉवरचे वीज कनेक्शन तोडले आहे. संपूर्ण बिलाची रक्कम भरेपर्यंत हे कनेक्शन जोडले जाणार नाही. मात्र, यामुळे मोबाईल नेटची सुविधा ठप्प झाल्याने गैरसोय होत आहे.
अवकाळी पाऊस
खेड : तालुक्यातील घेरा रसाळगड, वाडी जैतापूर, कुळवंडी, खोपी आदी १६ गाव विभागात झालेल्या अवकाळी पावसाने सर्वांची धावपळ उडाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कडक उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. बदलत्या हवामानामुळे बागायतींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला आहे.
रोटरी अव्वल
आवाशी : जिल्हास्तरीय फाईट व पुमसे खुली चॅलेंज स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १० पदकांची कमाई करीत अव्वल स्थान मिळविले. या स्पर्धेत शाळेतील १३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विधी गोरेने लहान गटात सुवर्णपदक मिळविले. तर सब ज्युनिअर गटात आयुष जाधव याने सुवर्ण, सार्थक ढेबे, कस्तुरी भालेकर रौप्य तर सिद्धी निकम हिने कांस्यपदक मिळविले.
भाजपचे निवेदन
खेड : शहरातील ब्राह्मण आळी, कासारआळी, कुवारसाई, एकवीरा नगर आदी भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहर भाजपतर्फे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोन्या-चांदीचे दर उतरले
रत्नागिरी : गेल्या दहा दिवसांत सोन्याचे भाव कमालीचे उतरले असून २२ कॅरेटचा दर प्रती दहा ग्रॅमला ४३ हजार तर २४ कॅरेटचा प्रती दहा ग्रॅम ४४ हजार रुपये झाला आहे. तर १किलो चांदीचा दर ६६ हजार रुपयांवर खाली आला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या - चांदीचे दर घसरू लागले आहेत.