रत्नागिरी : खान्देश, विदर्भ याठिकाणी फिरण्यासाठी काेकणातून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या भागात असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना काेकणातील बहुतांशी लाेक भेट देतात. मात्र, त्याठिकाणी जाण्यासाठी द्रविडी प्राणायाम करावे लागतात. काेकणवासीयांचा हा प्रवास सुखकर हाेण्यासाठी काेकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन नाव देऊन मडगाव ते नागपूर अशी कायमस्वरूपी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती ग्रुपचे दापोली-मंडणगड जनसंपर्क तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतुले यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जलसंपदा मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे दिले आहे.
विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर, अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तिजापूर येथील कार्तिकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूचे स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा मंदिर, धुळे येथील देवापूर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. मात्र, तेथे जाण्यासाठी कायमस्वरूपी गाडी नसल्याने प्रवाशांचे हाल हाेत आहेत.
त्यामुळे कोकण ते खान्देश, विदर्भ अशी महाराष्ट्र दर्शन म्हणून गाडी सुरू करावी. या गाडीला थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड असे थांबे देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही गाडी सुरू केल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून जाणाऱ्यांची गैरसाेय दूर हाेइल, असे त्यांनी म्हटले आहे.