खेड : गुरूवारी झालेल्या पावसाने खेड शहरातील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे़ विशेषत: गांधी चौक येथील किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले असून, कमी नुकसान तीनबत्ती नाका येथील दुकानांचे झाले आहे. केवळ खेड शहरातील २३७ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे तर ही दुकाने वगळता इतर घरे व धान्य, जनावरे तसेच मेंढ्या आणि गोठे यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ एकूण १२ कोटी ६२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती खेड तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे़ खेड शहरातील दुकानांमध्ये साचलेला गाळ व चिखल काढण्याचे काम अद्यापही सुरूच असून, नगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर किराणा दुकानांचा समावेश आहे. शहरातील गांधी चौक, तीनबत्तीनाका, वाणीपेठ व पानगल्ली तसेच मटण मार्केट आणि तीन मोहल्ले येथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील काही घरांमधील नुकसानीचे पंचनामे अद्याप करावयाचे आहेत तर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही पंचनामेही अद्याप शिल्लक आहेत. काही व्यापाऱ्यांनी विमा उतरविला असला, तरीही बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या मालाचा विमा उतरवला नसल्याचे पंचनाम्यातून पुढे आले आहे. (प्रतिनिधी)
खेडमध्ये चिखल काढण्याचे काम सुरु
By admin | Published: September 25, 2016 12:50 AM