रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी दोन वर्षे रद्द करण्यात आलेली वादग्रस्त लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पार पडली. त्यानंतर आता टेक्निकल विषयासंदर्भात असलेली लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा शनिवारी, २७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचे केंद्र केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्येच असल्याने, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या केंद्रांवर जायचे कसे, ही विवंचना या मुलांना सतावू लागली असल्याने, आता ही मुले सैरभैर झाली आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. टेक्निकल विषयासंदर्भातील परीक्षाही गेल्या एप्रिल महिन्यात होती. मात्र, तीही रद्द करून २७ मार्च रोजी होणार आहे. यासाठी केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्येच परीक्षेचे केंद्र आहे. इतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी जिल्हास्तरावर केंद्रे असतात. मात्र, या परीक्षांसाठी मुंबई वगळता कोकणात अन्य जिल्ह्यात केंद्र नाही. सध्या या शहरांमध्ये काेरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने, परीक्षेला कसे जायचे, हे मोठे संकट या विद्यार्थ्यांसमोर आहे. त्याचबरोबर या शहरांमध्ये वेगाने काेरोना वाढत असल्याने राज्य सरकारने या शहरांमध्ये लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे परीक्षेला गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन झाले, तर या शहरांमध्ये अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वर्षभर ज्या परीक्षेची वाट पाहिली, त्या परीक्षेला जावं की न जावं, हा संभ्रम या मुलांमध्ये निर्माण झाला आहे. काहीजण भीतीमुळे परीक्षेला गेले नाहीत.
सध्या कोरोनाचा या शहरांमध्ये वाढू लागलेला संसर्ग पाहता, एका दिवसासाठी परीक्षेला जाणे, यातही धोका वाटू लागला आहे. त्यातच आता कोकणातील लोकप्रिय शिमग्याचे २८ आणि २९ मार्च हे दोन दिवस महत्त्वाचे असल्याने मुंबईहून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे एस.टी. गाड्या तसेच कोकण रेल्वेनाही आगावू आरक्षण आहे. त्यामुळे परीक्षेनंतर लगेचच परत येतानाही अडचणीचे होणार आहे. काही मुलांची केंद्रे एकाच ठिकाणी आहेत. अशा मुलांनी खासगी गाड्यांनी एकत्र जाण्या-येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात या शहरात न थांबता परत येता येईल. शासनाने या परीक्षेसाठी कोकणात केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे.
कोटसाठी
एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरावर केंद्र आहे. टेक्निकल एमपीएससी परीक्षेसाठी मात्र ठराविक शहरांमध्येच केंद्रे ठेवली जातात. त्यामुळे कोकणातील मुलांची गैरसाेय होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे केंद्रही कोकणात व्हावे.
- साईल शिवलकर, परीक्षार्थी, रत्नागिरी