मनोज मुळ््ये रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ झाली असली तरी त्या तुलनेत कोकण अजून कूल आहे. त्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. कोकणाबाहेरील जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांसाठी कोकणातील वातावरण थंड आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानातही कोकणातील पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. एका अर्थाने तीव्र उन्हाचा त्रास सहन करणाऱ्यांना कोकणातील हवामानाकडून पर्यटनाचे निमंत्रणच दिले जात आहे.परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा हंगाम लगेचच सुरू होतो. यावेळी मात्र निवडणुका असल्यामुळे हा हंगाम काहीसा लांबला आहे. १३, १८, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यातील तीन टप्पे पूर्ण झाले आहेत आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुका सोमवारी २९ रोजी होत आहेत. निवडणुकांमुळे बहुतांश सरकारी कर्मचारी कामातच अडकून पडले आहेत.
मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुरू झाल्या तरी पर्यटकांचे आगमन झालेले नाही. हॉटेल व्यावसायिकांकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुकिंगबाबत तसेच १५ मे नंतरच्या बुकिंगबाबत राज्यभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे या दोन टप्प्यांवर पर्यटकांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर सध्या ३५ ते ३८ अंश इतके तापमान झाले आहे. कोकणच्या दृष्टीने पारा भडकलेलाच आहे. कोकणासाठी हे तापमान अधिक आहे. मात्र, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पारा ४० ते ४२ अंशापुढे गेला आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीतील तापमान कमीच आहे. आताच्या दिवसात समुद्राकडून वाहणारे वारे या उन्हाची तीव्रता काहीशी कमी करतात. त्यामुळे कोकण अजून इतरांच्या मानाने थंड आहे.सर्वसाधारणपणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाºया पर्यटकांपैकी ७५ टक्के लोक हे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतूनच येतात. उर्वरित लोक राज्याबाहरील असतात. कोकणात येणाºया पर्यटकांमध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधील लोकांचेच प्रमाण अधिक असल्याने आणि तेथील तापमान कोकणापेक्षा अधिक असल्याने त्यांची पावले कोकणाकडे वळतील, असे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना अपेक्षित आहे.
दोन दिवसांपूर्वी बडोदा येथून काही पर्यटक आमच्याकडे आले. वातानुकुलित खोल्या शिल्लक नव्हत्या. पण नुसता पंखा असूनही त्यांना उन्हाळ्याचा त्रास जाणवला नाही. आमच्याकडे खूपच गर्मी आहे. इथे आवडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पहाटेच्यावेळी वाळू थंड झाल्यानंतरचे वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे या वातावरणात पर्यटक अधिक येतील, अशी अपेक्षा आहे.- प्रमोद केळकरहॉटेल व्यावसायिक, गणपतीपुळे
निवडणुकांमुळे अजून पर्यटन हंगाम सुरू झालेला नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि १५ मे नंतर पर्यटकांचे बुकिंग चांगले आहे. वाढलेल्या तापमानामुळे पर्यटक बाहेर पडत नाहीत. प्रवासाचा त्रास होतो. मात्र, सध्या कोकणात येणारे इतर जिल्ह्यातील लोक इथल्या वातावरणाबाबत समाधानी आहेत. स्वच्छतेसारखे उपक्रम सातत्याने राबवले गेले तर कोकणातील समुद्रकिनारे गजबजतील.- बाबू बिरमोळे,हॉटेल व्यावसायिक, मालवण