रत्नागिरी : शहर पोलिसांचा उत्तम तपास आणि पाठपुरावा यामुळे गर्दीचा फायदा उचलून चेन चोरणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश करता आला. यामध्ये अजूनही काही संशयित असून, आम्ही त्यांच्या मागावर आहोत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. चोरीतील ३ चेन व रोख रक्कम ६ हजार ८०० तसेच गुन्ह्यातील स्वीफ्ट डिझायर कार व मोबाइल असा एकूण ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती डाॅ. गर्ग यांनी दिली.
रत्नागिरीत दाखल झालेल्या जन आशीर्वाद यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चार जणांच्या गळ्यातील सोन्याच्या अडीच लाख रुपयांच्या चेन चाेरीला गेल्या हाेत्या. ही घटना २७ ऑगस्ट राेजी घडली हाेती. याप्रकरणी सातजणांच्या मुसक्या शहर पोलिसांच्या पथकाने बीडमधून आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारसह ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. पाेलिसांनी दत्ता जाधव, परशुराम गायकवाड, दत्ता गुंजाळ (३३), सागर कारके (२१), नितीन गायकवाड (२४), रमेश जाधव (५५), बाळू जाधव (२८,सर्व रा. बीड) यांना ताब्यात घेतले आहे.
शहर पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्याआधारे एक-एक दुवा जोडत बीड येथून संशयितांना ताब्यात घेतले. हे सातजण सराईत गुन्हेगार असून, ते ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक जत्रा, मेळावे तसेच रॅलींमध्ये सहभागी होऊन अशाप्रकारे चोरी करत असल्याची माहिती डाॅ. गर्ग यांनी दिली. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले,पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकाॅन्स्टेबल प्रसाद घोसाळे, पोलीस नाईक योगेश नार्वेकर, अमोल भोसले, राहुल घोरपडे, नंदकुमार सावंत, वैभव शिवलकर, मंदार मोहिते, कांबळे, रमिज शेख, आशिष भालेकर, पोलीस शिपाई निखिल माने, पोलीस हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर, तसेच बीड येथील पेठबिड पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
-----------------------------
काॅलिंग सेंटर प्रकरणी तपास सुरू
आंतरराष्ट्रीय बनावट कॉलिंग सेंटर प्रकरणी वेगवेगळ्या बाजूने तपास सुरू आहे. सध्या तरी शासनाची फसवणूक करून अवैध आंतरराष्ट्रीय कॉल केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, तरीही यामध्ये दहशतवादी संपर्काचे काही कनेक्शन आहे का तेही तपासले जाणार आहे, असे डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.