आबलोली :
गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील किराणा माल, कापड दुकान, शिवणकाम, कटलरी, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, लोहारकाम, सलून, पार्लर, हार्डवेअर, इलेक्ट्रिक, दुरुस्ती आदी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी तहसीलदार गुहागर यांना निवेदन दिले आहे. त्याची प्रत थेट मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी रत्नागिरी, सभापती गुहागर, सरपंच आबलोली यांना स्पीड पोस्टाने पाठवली असून त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा येथील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढले असून या कर्जाचे हप्ते, दुकानभाडे, वीज बिल, घरखर्च हा व्यवसाय करून भागवत आहोत, पण सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे आमचे उपजीविकेचे साधन बंद करावे लागत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. हे निर्बंध मागे घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. आम्ही शासकीय नियम पाळून व्यवसाय करण्याची हमी देत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
व्यवसाय सुरू करण्याची परवानगी न दिल्यास आपण तहसीलदार कार्यालय गुहागर येथे उपोषणास बसू असे निवेदन आबलोली बाजारपेठेतील ६६ छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दिले आहे. त्यावर कोणता निर्णय घेतला जातो याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.