असगोली : गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचे टॉवर असूनही सेवा वारंवार खंडित होत आहे. ही सेवा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर शाखेतर्फे करण्यात आली आहे.
ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. अनेक मुंबईकर गावी येऊन बसले आहेत आणि घरातून ऑनलाईन काम करीत आहेत. शाळा बंद असल्याने मुलांचाही ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे.
अशावेळी अशी तकलादू सेवा दूरसंचार निगमकडून मिळत असल्याने गावातील ग्रामस्थांना, तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी उपअभियंता, भारत दूरसंचार निगम, गुहागर यांना सेवा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, तेजस पोफळे, वैभवी जानवलकर, दिनेश निवाते, कौस्तुभ कोपरकर, वनिता निवाते, ऋतिक गावणकर, रूपेश घवाळे, रोहित खांबे, शैलेश खांबे, सानिका मेटकर, विलास तांबे, नितीन खांबे, अजित पोफळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.