देवरुख : शहरातील खालची आळी येथील पारंपरिक पावसाचे पाणी वाहून जाणारी सारण येथे मारुती राऊत यांनी पक्के बांधकाम करून बंद केली आहे. यामुळे परिसरातील वाहून येणारे पाणी अडू लागले आहे. या दुर्गंधीयुक्त साठलेल्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ही बंद केलेली सारण मोकळी करून मिळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज
रत्नागिरी : पाच तालुक्यांमध्ये जीवरक्षक ५ बोटी आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्यही तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ४५ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग, घाटरस्ते तसेच जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरही दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
म्युकरमायकोसिसची जिल्ह्यात भीती
रत्नागिरी : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकाचा मृत्यू रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोघांचा मृत्यू मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण ८ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिक्षात अचानक नागोबा दिसल्याने धावपळ
रत्नागिरी : बावनदी येथून रिक्षातून प्रवासी रत्नागिरीकडे निघाले होते. त्यावेळी रिक्षात मागील बाजूस नाग असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांची धावपळ उडाली होती. प्रवाशांनी तत्काळ ही बाब रिक्षाचालकाच्या लक्षात आणून दिली. प्रसंगावधान राखून रिक्षाचालकाने निवळी फाट्याजवळ रिक्षा थांबवली. तेथे सर्पमित्र राकेश पाटील यांनी नागाला सुखरूपरीत्या पकडले.
आराेग्य सुविधा प्रदान
हातखंबा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि माभळे, कुरधुंडा, ओझरखोल, कोळंबे, आंबेड आदी गावांतील रुग्णांना रुग्णवाहिका तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. ती मागणी अखेर सामंत यांनी पूर्ण केली.
मत्स्यगंधा एक्स्प्रेस १५ जूनपासून धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते मंगलोर सेंट्रल या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. कोरोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे.
अवैध वाळू उत्खनन
खेड : पर्यावरणाच्या कारणास्तव तालुक्यात उत्खननाला बंदी असतानाही तालुक्यातील आंबवली, सुकीवली परिसरात जगबुडी नदीपात्रातून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही.