रत्नागिरी : शहरातील साळवी स्टाॅप येथील घनकचऱ्याचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशीनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प जागेअभावी रखडला आहे. दांडेआडोम येथील सुमारे ६ ते ७ एकर जागेचा विषय न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर नगर परिषदेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र, हा प्रकल्प रद्द करण्यात आला.
आता हक्काची जागा सोडून नगर परिषदेच्या एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या मदतीने काही कंपनीशी त्यांनी चर्चा केली. या कंपन्यांनी मोठमोठ्या शहरामध्ये डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले होते.
पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया
पहिल्या टप्प्यात २८ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. बायो मायनिंग मशीनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मीटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
...अशी होते प्रक्रिया
वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या घनकचरा जेसीबीने हलविला जातो. त्यावर बायो कल्चर हे रसायन मारून तो सुकवले जाते. त्यानंतर बायो मायनिंग या मशीनच्या पट्ट्यावर (बेल्टवर) जेसीबीने कचरा टाकला जातो. तो मशीनमध्ये आल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. यात कचऱ्याचा विघटन होऊन प्लास्टिक बाजूला केले जाते. त्यानंतर तयार झालेले खत खाली पडते.