रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटू लागले होते. मात्र, पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून, ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलीमीटर (२६.७१ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.
गुरुवारपासून पावसाने जोर घेतला होता. मात्र, एकाच दिवसात पुन्हा प्रमाण कमी झाले आहे. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. प्रत्यक्षात गुरुवारनंतर ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जोरदार पाऊस पडेल, असे वाटू लागते. मात्र, थोड्याच वेळात ऊन पडू लागते.
सध्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हीच स्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना खीळ बसली असून, अनेक भागांमध्ये लावणीची कामे खाेळंबली आहेत. बळीराजा पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, अजूनही पावसाची हुलकावणी सुरूच आहे. गेल्या २४ तासांत नोंदविलेल्या एकूण पावसापैकी गुहागर आणि लांजा तालुक्यात अधिक पावसाची नोंद झाली असून, इतर तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे.