लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात चाैथ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवांना तसेच काही बाबींना ठराविक वेळेसाठी मुभा दिली आहे. मात्र, हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही बंदी असून केवळ घरपोच सेवा आणि पार्सलसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सध्या या सेवांनाही तितकासा प्रतिसाद नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च कसा भागवायचा, ही चिंता हाॅटेल व्यावसायिकांसमोर उभी आहे.
हाॅटल्स सध्या केवळ घरपोच सेवा आणि पार्सल सेवा देत आहेत. वर्षभर हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. हाॅटेलला विविध वस्तूंचा पुरवठा करणारे अनेक छोटे छोटे व्यावसायिक अवलंबून आहेत. मात्र, हाॅटेल्स अजूनही सुरू झालेली नसल्याने या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते हाॅटेल्स सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
साेमवार ते रविवार केवळ
घरपोच सेवा पार्सल सेवा
जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना तसेच काही बाबींना ठराविक वेळेसाठी परवानगी दिली आहे.
हाॅटल्समध्ये ग्राहकांना बसण्याची परवानगी न देता केवळ पार्सल आणि घरपोच सेवेला मुभा आहे.
ग्राहकच नसल्याने व्यवसायावर संकट, कर्मचाऱ्यांचे पगार कसे करणार, खर्च कसा भागणार, ही विवंचना.
हाॅटेलला विविध वस्तूंचा पुरवठा करणारे छोटे-छोटे व्यावसायिकही संकटात.
हाॅटेलमध्ये ५० टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्याची परवानगी देण्याची हाॅटेल व्यावसायिकांची मागणी.
शासनाने जवळपास वर्षभरच हाॅटेल व्यवसायाला पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. सध्या केवळ घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सेवेला अजूनही अल्प प्रतिसाद मिळत असल्याने म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. तरीही कर्मचाऱ्यांचे वेतन, हाॅटेलचे भाडे, वीज बिल आदींचा खर्च करावा लागतो. हाॅटेल व्यवसायावर अन्यही ३० ते ३५ व्यवसाय अवलंबून असतात, त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे.
- उदय लोध, पदाधिकारी, जिल्हा हाॅटेल असोसिएशन, रत्नागिरी
हाॅटेल कर्मचाऱ्यांच्या
हालात आणखी वाढ
जवळजवळ वर्षभर हाॅटेल व्यवसाय बंद राहिल्याने आमचे काम थांबले आहे. काहींना नोकरी सोडावी लागली आहे. तर काहींना अर्ध्या पगारावर काम करावे लागले आहे. त्यामुळे कुटुंबाचे कसे भागवायचे, ही चिंता मोठी आहे. घरात वृद्ध आई -वडील, पत्नी, मुले असे कुटुंब असल्याने कसे जगायचे, हीच चिंता आहे.
-सदा रामाणे, हाॅटेल कर्मचारी
शासनाने किराणा दुकानांना ठराविक वेळेसाठी परवानगी दिली आहे. तशी परवानगी हाॅटेल सुरू करण्यासाठी द्यावी, नाहीतर आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. गेल्या वर्षापासून आम्हाला कामावरून कमी केले आहे. हाॅटेल सुरू झाल्यावर परत घेतले जाणार आहे. त्यामुळे हाॅटेल सुरू होण्याची किती दिवस वाट बघायची?
- रेखा जाधव, हाॅटेल कर्मचारी