राजापूर : काही दिवसांपूर्वी कोकणातून गेलेल्या तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या तालुक्यातील जनतेला अद्यापही भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे़ दरम्यान, तालुक्यातील नुकसानग्रस्त जनतेला शासनाकडून केव्हा भरपाई मिळणार आहे, अशी संतप्त विचारणा जनमानसातून केली जात आहे.
दक्षिणेकडून आलेल्या व गुजरातकडे सरकलेल्या तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. त्यामध्ये सुमारे दीड कोटीच्या आसपास नुकसान झाले आहे़ येथील तालुका प्रशासनाकडून तेवढ्या रकमेची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे. मात्र, त्याला बरेच दिवस लोटले तरी नुकसानग्रस्त जनतेला अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे़ तालुक्याला अजूनपर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त जनता शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहे़ याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता अजूनही वादळातील बाधित जनतेला भरपाईची रक्कम आलेली नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता नेमकी केव्हा ही मदतीची रक्कम मिळणार आहे, अशी संतप्त विचारणा नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे़