रत्नागिरी : शहरातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळील रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा टाकून २८,८९६० रुपये किमतीचा देशी विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ जून राेजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली़ याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी (४४, रा. रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी येथे देशी विदेशी मद्याचा साठा करण्यात आला असल्याची माहिती भरारी पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी ओमगाैरी चायनीज सेंटर येथून देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला. तसेच संशयित लॉकडाऊनचा फायदा घेऊन त्याचे स्वत:चे वाहनातून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्या हुंदाई आय १० गाडीची झडती घेतली असता. त्यामध्ये देशी विदेशी मद्याचा साठा आढळला़ ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली.
---------------------------
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची व गोवा बनावट मद्याची विक्री हाेण्याची शक्यता अधिक आहे़ अवैध दारूची विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवण्यात येणार आहे़
- व्ही. व्ही. वैद्य, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी