चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात रात्री अकराच्या सुमारास डोंगरातील मातीचा भराव महामार्गावर आला. परिणामी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून घाटाच्या खालील असलेल्या बौद्ध वाडीतील दहा कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान घाटातील वाहतूक बंद झाल्याने पर्यायी असलेल्या चिरणी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटात गेल्या वर्षभरापासून डोंगरकटाईचे काम सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी स्टेपिंग पद्धतीने डोंगरकटाई केली जात आहे. दरम्यान पावसाळा सुरू होताच काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरडी कोसळत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यातच शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बौद्ध वाडीच्या वरील बाजूस मातीचा भराव महामार्गावर आला. या घटनेची माहिती मिळतच प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीची यंत्रणा, महसूल आणि पंचायत समितीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रात्री एक वाजेपर्यंत दरड हटवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली होती.
दरड लोकवस्तीत येऊ नये यासाठी घाटात संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून खालील बाजूस असलेल्या पेढे बौद्धवाडीतील दहा कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. रात्री एक पर्यंत दरड हटवण्याचे काम सुरू होते या कालावधीत चरणी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. रात्री तीन पर्यंत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा परशुराम घाट व पेढे गावात कार्यरत होती. या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र पावसाळ्यात दरडींचा धोका असल्याने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आलल्या आहेत.