मंडणगड : चार दिवसांतील अतिवृष्टीत तालुक्यात आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासह दगड-मातीचा खच साचला आहे. मंडणगड, तुळशी, पाले, भिंगळोली याचबरोबर चिंचाळी, म्हाप्रळ या गावांच्या अंतरादरम्यान कोठेही गटार नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या हंगामात रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पाऊस सुरू झाल्यापासून रोड कनेक्टिव्हिटीत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. तुळशी घाट, पाले, भिंगळोली, म्हाप्रळ, शेनाळे घाट या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरात घाट व वळणे असताना रस्त्याच्या बाजूने साइडपट्टी व गटारे काढण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठले आहे. त्यातच यंदाच्या हंगामात जुन्या रस्त्यावरील बुजवण्यात आलेले खड्डे परत उखडल्याने महामार्गावर जागोजागी चिखलमिश्रित पाणी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तुळशी घाटातील बहुतांश वळणांवर गटारांअभावी रस्त्याशेजारी माती, वाळू रस्त्यावर येऊन साचली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून तालुक्यातील म्हाप्रळ ते आंबडवे या दोन गावांच्या हद्दीतील अंतरात दोन पदरी काँक्रीट रोडचे स्वप्न तालुकावासीयांना गेल्या पाच वर्षांपासून दाखवण्यात आलेले आहे. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही.