बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा, काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन
By शोभना कांबळे | Published: April 24, 2023 06:13 PM2023-04-24T18:13:10+5:302023-04-24T18:13:37+5:30
..तर खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही
रत्नागिरी : प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काॅंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेद दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राजापूर तालुक्यात उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात सर्वेक्षण सुरू केल्याने रिफायनरी विरोधी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल त्यामुळे मोठा उद्रेक होऊ शकतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे सरकारच्या बेपर्वा वृत्ती व नियोजन शून्य आयोजनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणावेळी जनता माळरानावर एकवटल्यास खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक जनतेचा बारसू रिफायनरीला असलेला विरोध लक्षात घेता, बारसू रिफायनरी सर्वेक्षणचे काम थांबवावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे निवेदन देताना महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शाहा, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस आतिफ साखरकर उपस्थित होते.