रत्नागिरी : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. पुढचे पाच दिवस, 16 मेपर्यंत हे संकट डोक्यावर घोंघावेल, समुद्रात वादळ सदृश्यस्थिती निर्माण होत आहे. कोकण-गोवा किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.तसेच 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात येत असून 15 मे व 16 मे 2021 या कालावधीत संबधितांना समुद्रात जाऊ नये असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.
कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाला हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात कोरोनाचे टेन्शन आता कुठे थोडे हलके होतेय तोच अस्मानी संकट पुढे येऊन ठेपले आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.परिणामी, राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. पुढचे पाच दिवस, 16 मेपर्यंत हे संकट डोक्यावर घोंघावेल, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अॅलर्ट जारी केला. वाऱ्याचा द्रोणीय भाग तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात गेले काही दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे.तीच परिस्थिती 'जैसे थे' राहून आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.
कोकण परिसरात 15 आणि 16 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. मात्र यादरम्यान वारे ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहतील. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचा हा परिणाम आहे. 15 आणि 16 मे हे दोन दिवस अधिक खबरदारीचे असतील. कारण या दोन दिवसांत वाऱयाचा वेग वाढलेला असेल. मध्य महाराष्ट्र, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मुसळधार पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईला धोका नाही
चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसेल , असे कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले . चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने न येता दक्षिणेकडून आखाती देशांच्या दिशेने पुढे सरकत जाण्याची शक्यता आहे . परंतु या पाच दिवसांत खबरदारी म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान अधिकाऱ्यांनी दिला आहे .
अनेक राज्यांसाठी ' यलो अॅलर्ट '
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अनेक राज्यांना 'येलो अॅलर्ट' जारी केला आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता असून ते पुढे उत्तर पश्चिम भागात सरकेल. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीसह केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकमध्ये 14 मेच्या रात्रीपासूनच सतर्कता बाळगण्यात यावी. 14 आणि 15 मे रोजी केरळ, लक्षद्वीपच्या काही भागांत तर 15 रोजी दक्षिण कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे ट्विट हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.