लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सोसाट्याच्या वाऱ्यासह काेसळलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यात वृक्ष, वीजखांब कोसळून जोरदार फटका बसला. तसेच काही ठिकाणी घरांचे पत्रे उडूनही मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून येथे वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. या वादळामुळे तालुक्यातील वीजपुरवठा दुपारपासूनच खंडित केला होता.
ताेक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना शनिवारपासूनच हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. शनिवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला होता. मात्र, दुपारी पाऊस थांबला आणि सायंकाळी ४ वाजल्यापासून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष व फांद्या कोसळल्या. त्यामध्ये तालुक्यातील खडपोली व कळंबस्ते - भुवडवाडी येथे दोन वीजखांब कोसळले. तसेच वेहेळे येथील संजय राजेशिर्के यांच्या घराचे छप्पर उडाले. त्यांच्या घरावरील एका बाजूचे पत्रे पूर्णपणे उडून गेले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कान्हेचे तलाठी कणसे यांना देण्यात आली.
शहरातील गोवळकोट रोड परिसरात रस्त्यावर दोन जुनाट वृक्ष कोसळले. मात्र, नगर परिषदेने तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने हे वृक्ष हटवले. तसेच नगर परिषदेचे पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. याशिवाय कामथे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथे जनरेटरच्या साहाय्याने वीज पुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. तसेच अन्य कोविड सेंटरवरही लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
-------------------------
चिपळूण तालुक्यातील वेहेळे येथे घराचे पत्रे उडून नुकसान झाले.
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते - भुवडवाडी येथे वीजखांब कोसळून नुकसान झाले.