राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसराला बुधवारी वादळसदृश वाऱ्याचा जोरदार दणका बसला. यामध्ये रायपाटण, पाचल परिसरामध्ये पडझड झाली आहे. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले उडाली आणि पत्रे उडाले. वाऱ्यामुळे बुधवारी रात्रीपासून परिसरातील वीज गायब झाली होती.राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढला आणि वादळसदृश वारे वाहू लागले. वाऱ्याबराेबरच पावसानेही हजेरी लावली हाेती. वाऱ्यामुळे रायपाटणमधील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडी, सनगरवाडी, बाजारवाडी आदी वाड्यांसह पाचलमधील काही वाड्या आणि परिसरातील घरांना वाऱ्याचा फटका बसला.वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली हाेती. वादळात घरांवरील कौले-पत्रे उडाली. रायपाटण होळीचा मांडावरील उभारलेली होळी एका बाजूला थोडीशी कलंडली होती. ग्रामस्थांनी ती पुन्हा सुस्थितीत केली. तर पाचलमधील होळीच्या मांडावरही पडझड झाल्याची घटना घडली.रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एक वृक्ष उन्मळून पडला तर गावातील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडीमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने गावासह लगतच्या परिसरातील विद्युत पुरवठा प्रदीर्घकाळ खंडित झाला होता. गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. परिसरातील मोबाइल सेवाही खंडित झाली होती. रायपाटणमधील श्रीरेवणसिध्द मठामध्येही पडझड झाली आहे. वाऱ्यामुळे हाेळी मांड येथील देवतांच्या पालख्या आजूबाजूच्या घरांमध्ये बसवाव्या लागल्या.वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे.
राजापूरच्या पूर्व परिसराला वाऱ्याचा तडाखा, घरांची कौले-पत्रे उडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 6:47 PM