रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, किनारपट्टीवर धडकणाऱ्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला या भागांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या सर्व बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत, खलाशांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन सज्ज असून, पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी दोन बैठका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.वादळामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोविड सेंटरच्या ठिकाणी जनरेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत स्थलांतर करण्याची तयारीही करण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. एनडीआरएफच्या टीमशी जिल्हाधिकारी सतत संपर्कात आहेत.मागील अनुभव विचारात ग्रामीण भागातील संपर्क तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लाकूड कापण्याचे कटर, जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांसह रत्नागिरी शहरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. कोणीही विनाकारण समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे.