या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला राखलेला पैसा असला, तरी त्या वर्गाकडे समाजभानही आहे. हा वर्ग अतिश्रीमंत नाही व कंगालही नाही. मात्र, त्याची मदत गरज लोकांना विविध प्रकारे मिळत असते. आदिवासी मुलांसाठी कसलीही, प्रसिद्धीचीसुद्धा अपेक्षा न ठेवता हिवाळ्यात ब्लँकेट्स भेट देणारा बँकेतील एखादा निवृत्त अधिकारी मी पाहतो, तेव्हा समाधान वाटतं. ती व्यक्ती नास्तिक आहे; पण माणुसकीने प्रेरित आहे. तेवढं पुरेसं आहे. मानवता हाच आजचा धर्म आहे. कर्मकांड आम्ही करीतच नाही. उत्सवांवर तर मायबाप सरकारनेच निर्बंध आणलेले आहेत. निरीश्वरवादी तुम्ही कितीही झाकून ठेवले, तरी ते आपोआप मनातून उजळत असतात व प्रकाशही देत असतात. ज्ञानविज्ञान दीर्घकाळ पुरतं.
नास्तिकता चेपून, गाडून टाकणं ही लबाडीच आहे. शिक्षणही एकतर्फी, पारंपरिक आहे. त्यामुळेच ते माणसाला पुन्हा मागे मागे नेतं. माणसं, शिक्षक - प्राध्यापक असे रिव्हर्स होताना मी पाहतो. तेव्हा नवल वाटतं!
माणसाने ज्ञानाला वाळूच्या कणांची उपमा दिली. ज्ञान मिळलं की, मनात अशी वादळं सुरू होतात. माझ्या आसपास जी माणसं इमारतीत राहातात, त्यांच्या मनात असे कोणतेही विचार नसतात. त्यातले बहुतेक लोक वृत्तपत्रसुद्धा वाचत नाहीत. बायकांना फक्त जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे एवढीच चिंता असते. नंतर त्या गृहिणी काहीच करत नाहीत. जगात काय चाललं आहे तेही माहीत नसतं. कोकणातला हा कोरडा दुष्काळ स्थानिक साहित्यिकांनी कधी नीट मांडला नाही. शिक्षकांचं लिखाणही अगदी ‘प्राथमिक’ वाटतं. अस्तित्वाचं काही आकलन त्यांना शास्त्रीय पातळीवर झालेलं दिसत नाही. म्हणून ते कालबाह्य गोष्टीचं समर्थन, उदात्तीकरण आणि अनुकरणही करतात. अध्यापनातून तेच मांडतात.
शेवटी माणुसकी मानणारा बुद्धिप्रामाण्यवादच जिंकणार आहे. हे मला नक्की माहीत आहे. वर्षानुवर्षे सत्य मांडणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराला कोकणाने वाळत टाकल्यासारखी वागणूक जरी दिली, तरी आमचे विज्ञानवादी, पर्यावरणवादी विचार मानवजात वाचवताना मनावर घ्यावेच लागतील! तो काळ आता आलेला आहे हे नक्की! झपाट्याने अधोगती व ऱ्हास होत असताना इंटरनेटच्या आभासी, भ्रामक व्यसनात न रमता प्रत्यक्ष ‘हार्डवर्क’ करत घाम गाळावा लागेल. घामाच्या थेंबांचे मोती होतील. ज्या उद्योजकांनी अशी कडी मेहनत खडी केली तेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या स्पर्धेत टिकले. परदेशात जाऊन राहणंही गैर नाही. माय मराठी आपण तिकडेही प्रसारित करू शकतो. प्रचंड मोठं जग आता आपलं आहे. ‘इमान’ महत्त्वाचं!!
- माधव गवाणकर, दापोली