शिवाजी गोरे।
दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या पगाराची नोकरीही मिळाली. अखेर मुंबई सोडून गावात येऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने कातळावर मातीचा भराव करून भात, नाचणी खरीप पीक घेतले. रब्बी हंगामात त्याने कलिंगड, स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, भोपळा ही पिके घेऊन पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
सुधारित बियाण्यांचा वापर करून आधुनिक पध्दतीने त्याने मोठ्या कष्टाने शेती केली. सेंद्रीय कलिंगड शेतीतून त्याला ३ लाख रुपयांचा नफा झाला असून, एका वर्षात तांबे कुटुंबीय अडीच एकर शेतीतून लखपती झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नानटे गावातील तरुण शेतकरी नीलेश तांबे या शेतकºयाने आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे. स्ट्रॉबेरी शेती फक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर भागातच आपल्याला पाहायला मिळते. याठिकाणी ही शेती चांगल्या पध्दतीने होते, असा लोकांचा समज आहे. परंतु अलिकडे कोकणातही स्ट्रॉबेरी शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे कोकणातील अनेक शेतकºयांनी सिद्ध केले आहे.
नीलेश तांबे या शेतकºयाने आपल्या गावाकडील वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोकणातील तरुणवर्गाने मुंबईत जाऊन तूटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच राहून शेती करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. नीलेश एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून दोन गायी, दोन म्हशी, १० बकºया व ५० कोंबड्याही पाळल्या आहेत.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारी शाश्वत शेती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तांबे या तरुण शेतकºयाला कृषी विभागाकडून सेंद्रीय खत, बियाणे, मल्चिंग पेपर, शेती अवजारे सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत.
कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी अतिशय चांगली, गोड, गडद रंगाची आहे. टिकून राहण्याची क्षमता अधिक असल्याने लवकर खराब होत नाही, त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा कोकणातील स्ट्रॉबेरीची चव अधिक चांगली आहे.
- नीलेश तांबे, तरुण शेतकरी