रत्नागिरी - कोरोनाबाधीत रुग्ण आढळलेल्या रत्नागिरीतील राजीवडा मोहल्ल्यात शनिवारी आरोग्य सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य सेविकांना मोहल्ल्यातील लोकांनी पिटाळून लावले. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मोहल्ल्यात जाऊन सर्वेक्षण रोखणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर हे काम सुरू झाले.
दिल्ली निजामुद्दिन मरकजमध्ये सहभागी झालेला रत्नागिरी राजीवडा येथील एक प्रौढ कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळलाआहे. शुक्रवारी त्याचा अहवाल आल्यावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने हालचाली सुरू करून १८ जणांना रुग्णालयात दाखलकेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी आरोग्य खात्यातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना पिटाळून लावले.ही बाब समजताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला.डॉ. मुंढे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ध्वनीक्षेपकावरुन लोकांना सर्वेक्षणासाठी आवाहन केले. या कामात आडथळा आणणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर हे काम सुरु झाले आहे.