पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरातील गावांमध्ये दिवासागणिक झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या कडक संचारबंदीला पाचलवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे.
संचारबंदी सुरू झाल्यापासूनच पाचल बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. डाॅक्टर, औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवली आहेत. त्यामुळे बाजारपेठच बंद असल्यानेे लाेकांची गर्दी आपोआपच कमी झाली आहे. पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर व ग्रामविकास आधिकारी नागरगोजे यांनी ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती करून लाेकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला पाचलवासीयांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी बाजारपेठेत बंदोबस्त ठेवला असून, बाजारपेठेतील गस्त वाढविली आहे. बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांना चांगलीच जरब बसली आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण गर्दी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. रायपाटण पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.