साखरपा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील मुर्शी चेकनाका येथे जिल्ह्याच्या सीमेवर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनाची व आतील लोकांची तपासणी करूनच ते पुढे पाठविले जात आहे.
मोबाईल टेस्टिंग सेंटर सुरू
चिपळूण : शहरात ठिकठिकाणी मोबाईल टेस्टिंग सेंटर सुविधा सुरू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ही मोहीम शहरात सुरू रहाणार आहे. यामध्ये आरटीपीसीआर व अँटिजेन या दोन्ही टेस्ट मोफत होणार आहेत. तालुका आरोग्य यंत्रणा व चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून ही सुविधा राबविण्यात येणार आहे.
श्रमदानातून साफसफाई
देवरुख : दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे (कोकण विभाग) संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथील महिमतगड येथे श्रमदान व गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली. दुर्गवीर सदस्यांसह तालुक्यातील १३ तरुण सहभागी झाले होते. गडावर ठिकठिकणी साफसफाई करण्यात आली.
स्वरूप गुरव यांची निवड
लांजा : येथील नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव यांची निवड झाली आहे. लांजा नगर पंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे गुरव यांची निवड बिनविरोध झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले होते. गुरव यांचा एकमेव अर्ज आला होता.
कर्करोग मार्गदर्शन
चिपळूण : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून अॅन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरतर्फे महिलांना कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली. डॉ. तेजल गोरासिया, खडकबाण यांनी भारतापेक्षा पाश्चिमात्य देशात कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे आणि वयोमानाप्रमाणे कर्करोगाची जोखीम वाढत असल्याचे नमूद केले.
वाहनचालकांतून समाधान
पावस : भाट्ये ते गावखडी सागरी महामार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहनचालक, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. रेवसरेड्डी मार्गावरील भाट्ये - पावस - पूर्णगड - गावखडी रस्त्याचे एकूण चार किलोमीटर रस्त्याचे विशेष दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
उपक्रमाची दखल
रत्नागिरी : तालुक्यातील टिके केंद्रस्तर आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा टिके कांबळेवाडी क्रमांक ३ ला प्रदान करण्यात आला. शाळेची आकर्षक बोलकी इमारत, संगणक कक्ष, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळांचा समाज संपर्क तसेच विविध शाळाबाह्य स्पर्धेतील यश यांची दखल घेत टिके कांबळेवाडी शाळेची निवड करण्यात आली आहे.
जीवन प्रकाश योजना
रत्नागिरी : महावितरणतर्फे १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ अखेर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणच्या माध्यमातून घरगुती वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टँकरने पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील कोपी रामजीवाडी येथे पाण्याची टंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दखल घेत टँकर उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील चार गावे व सहा वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.