रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, पाेलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान विनाकारण फिरणारे आढळल्यास त्यांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरांनी घराबाहेर पडणे टाळले हाेते.
जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून गाडीची तपासणी करण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी बराेबरच पेट्रोलिंगही सुरू हाेते. पोलिसांबरोबर पोलीस मित्र, शिक्षक, होमगार्ड हे नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत हाेते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सर्व नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली़ तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी बंदाेबस्ताच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्या. यावेळी परिविक्षाधीन अधिकारी डाॅ. सुदर्शन राठाेड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पाेलीस निरीक्षक विजय जाधव, मनाेज भाेसले, महिला पाेलीस उपनिरीक्षक मुक्ता भाेसले उपस्थित होते.
-------------------------------
रत्नागिरी शहरात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली असून, ठिकठिकाणी पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. (छाया : तन्मय दाते)