लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : जिल्ह्यात मागील काही महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन आता पुरे झाले. पुढे आर्थिक संकटालादेखील तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही निर्बंधासह दुकाने उघडी करण्यास मुभा द्यावी, असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला केले आहे. लोकांना टाळेबंदीत अधिक अडकवून ठेवणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. तसेच अतिवृष्टीनिमित्त ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात कर्फ्यू लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे लांजा, राजापूर मतदार संघातील व्यापारी संघटना व रिक्षा व्यावसायिक यांनी आमदार राजन साळवी यांना निवेदन दिले आहे. यापुढे लॉकडाऊन न करता शिथिलता देऊन दुकाने उघडी करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता व व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महामारीत लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. परंतु लोकांना उपाशी मारणेही योग्य होणार नाही. सर्व व्यवहार बंदीमुळे आगामी काळात मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती आहे. त्यामुळे परिस्थितीचे अवलोकन करून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शासनाने दिलेल्या निर्बंध व नियमाला अधीन राहून व्यापाऱ्यांना काही निर्बंध आणि वेळेची मर्यादा ठेवून दुकाने उघडी ठेवण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.