दापोली : तालुक्याने कडक लाॅकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या दिवशीही दापाेली शहरात शुकशुकाट हाेता.
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. गेले दोन दिवस दापोली तालुक्यामध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद आहेत, तसेच भाजी, दूध किराणा, बँकाही बंद असल्याने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरात फेरफटका मारण्याऱ्यांची संख्या आपोआप कमी झाली आहे. शहरातील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर व अँटिजनसारख्या चाचणीला सामोरे जावे लागत असल्याने अनेक लोकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. दापोली शहरात गेले काही दिवस सामान खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. मात्र, लाॅकडाऊनमध्ये सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने गर्दी ओसरली आहे.