गुहागर : जिल्ह्यात कडक लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर गुहागर पोलिसांनी तालुक्यात जोरदार नाकाबंदी केली आहे, तर आरोग्य विभागाच्या भरारी पथकाकडून कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी केली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तालुक्यात कडकडीत बंद दिसला.
गेली काही दिवस तालुक्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना थोडी सूट दिल्याने तालुक्यातील शृंगारतळी, आबलोली, तळवली, गुहागर आदी बाजारपेठांमधून किराणा, भाजीपाला, मेडिकल आदी ठिकाणी थोड्या प्रमाणात गर्दी दिसत होती. गुहागर पोलिसांनी तालुक्यात गुहागर नाका, रानवी फाटा, शृंगारतळी, आबलोली, तळवली आदी मुख्य ठिकाणी नाकाबंदी केली. तर तालुक्यात इतर ठिकाणी पोलिसांची सहा पथके गावागावातून फिरत कडक लाॅकडाऊन पाळला जात आहे ना, यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली़ गुरुवारी सकाळी कामावर बाहेर निघालेल्या अनेक जणांना समज देऊन पोलिसांनी परत पाठवले़ आरोग्य विभागानेही भरारी पथकाच्या माध्यमातून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून अँटिजन चाचणी करण्याची सुरुवात केली आहे. याबाबत सर्वांना माहिती मिळताच अनेकांनी याचा धसका घेतला़
-----------------------
गुहागर तालुक्यातील रानवी फाटा येथे पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला हाेता़ (छाया : संकेत गाेयथळे)