रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने रेड झोनमध्ये समावेश झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. पहिल्याचदिवशी सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वत्र कडकडीत शांतता होती.
राज्यात १ जूनपासून अनेक जिल्ह्यांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे, रुग्णांचा मृत्यू होण्याचे सरासरी प्रमाण अधिक आहे, अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २० टक्के सरासरीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत; तर ३.२४ च्या सरासरीने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात दोन्हीचे प्रमाण अधिक असल्याने आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
गुरुवार, दि. ३ ते बुधवार, दि. ९ जूनपर्यंत हा कडक लॉकडाऊन लागू राहणार आहे. या काळात औषध दुकाने वगळता अन्य कोणालाही दुकाने उघडण्यास परवानगी नाही. दुधाची विक्री होम डिलिव्हरी पद्धतीने करावयाची आहे. सरकारी व खासगी प्रवासी वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार किंवा वैद्यकीय कारणांसाठी प्रवासाला मान्यता असली, तरी त्यासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्हा पूर्ण शांत झाला होता.
पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस मित्र जागोजागी तैनात असून, रस्त्यावरून फिरणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. लसीकरणासाठी जाणाऱ्यांकडील संदेश तपासल्याखेरीज त्यांनाही सोडले जात नव्हते. आठ दिवस याच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. लोकांनी घरातच थांबून या लाॅकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.