लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने बंद असल्याने रस्ते निर्मनुष्य पहायला मिळाले, तर गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये भयाण शांतता पसरली हाेती.
शहरात दवाखाना आणि मेडिकल सुरू ठेवण्यात आली हाेती. मात्र, रविवार असूनही चिकन मार्केट, मटण मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट किराणाची दुकाने सर्व काही बंद ठेवण्यात आली हाेती. शहरातील केळकर नाका, मच्छी मार्केट या वर्दळीच्या ठिकाणी रविवारी नीरव शांतता हाेती.
ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात दापोली शहरात येतात. परंतु, रविवारी मात्र ग्रामीण भागातील लोकांनी घरीच राहून शासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. तसेच हॉटेल, रिसॉर्ट बंद ठेवण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना बीचवर जाण्यास त्या त्या ग्रामपंचायतीने मनाई केल्याने, गजबजणारे समुद्रकिनारे शांत दिसत हाेते.
एस.टी. स्टॅण्ड परिसर, केळकर नाका परिसर व बुरोंडी नाका परिसर येथे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांना पाेलिसांनी चांगलाच दणका दिला तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत हाेते.