रत्नागिरी : अत्यावश्यक सेवेतील एखाद-दुसरे वाहन वगळता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर दिसणारी प्रत्येक वाहने थांबवून पोलीस चाैकशी करीत होते. अत्यावश्यक सेवेतील असल्याची खात्री पटताच त्यांना पाठविण्यात येत होते.
सकाळपासून शहरात दूध, भाजी, फळे, पाव, वृत्तपत्र, चहा विक्रेत्यांची लगबग सुरू असते. मात्र, चहाच्या टपऱ्या अनेक दिवस बंद आहेत. दूध व वर्तमानपत्र वगळता अन्य व्यवसायांना बंदी करण्यात आल्याने विक्रेतेही घरीच थांबले आहेत. औषध विक्री, पेट्रोल पंप यांना वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. पोलीस सकाळपासूनच नाक्यानाक्यावर बंदोबस्तासाठी उभे असून पाेलिसांकडून ग्रामीण भागातही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दवाखान्यात जाणारे, लसीकरणासाठी ये-जा करणाऱ्यांनाही थांबवून चाैकशी करण्यात येत होती. दूध विक्रेत्यांनी घरपाेच सुरू केल्यामुळे दूध तसेच वृत्तपत्र खरेदीसाठी, माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणे नागरिकांनी टाळत असल्याने रस्ते मोकळे व सुनसान झाले आहेत.
ग्रामीण भागातही दुकाने, पिठाच्या गिरण्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. औषध विक्री, दवाखाने, शासकीय कार्यालये वगळता अन्य व्यवहार बंद आहेत. शेतीच्या कामाव्यतिरिक्त लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत.