लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठविणे अवघड बनले आहे. त्यासाठी एस.टी.ने आंबा वाहतुकीसाठी तयारी दर्शविली असून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक बागायतदार मार्केटऐवजी खासगी विक्रीवर विशेष भर देत आहेत. त्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस.टी. महामंडळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी एसटी आगार येथून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरिवली आगारात आंबा पेट्या पोचविण्यात येणार आहेत.
कोकणातील एस.टी. आगारापासून मुंबई पुण्यातील एसटी आगारापर्यंत मालवाहतुकीची उत्तम सेवा करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बारा तासात आंबे मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता नाही. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास विमा संरक्षणाची हमी महामंडळाने दिली आहे. मुंबईतील ग्राहकांनी आपल्या आंब्याच्या पेट्या आगारातून जमा करण्याची सुविधा केली आहे. तरी सर्व आंबा बागायतदारांनी अथवा ग्राहकांनी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.