लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : प्राथमिक शाळेचा घटता पट ही बहुतांश शाळांची डोकेदुखी आहे, परंतु गुहागर तालुक्यातील अंजनवेल क्रमांक २ प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होताच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ, पालकांच्या सभा घेऊन त्यांना शाळेचा उंचावलेला दर्जा, अभ्यासक्रमाची महती शाळेच्या मुख्याध्यापिका ममता विचारे यांनी पटवून दिली आहे. त्यामुळे २८ पटसंख्या असलेल्या शाळेची पटसंख्या तीनशे वर पोहोचविण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाची महती पालकांना पटवून दिली आहे. त्यामुळे शैक्षणिक, स्पर्धा परीक्षांसह विविध कला, क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होत असून राज्यस्तरीय यशापर्यंत मजल मारली आहे;मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे, हे ध्येय असून त्यासाठी सतत विद्यार्थी, पालकांना प्रोत्साहित करीत आहेत.
कोरोनामुळे गेले दोन वर्षे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. ग्रामीण भागातील काही पालकांकडे मोबाईल नाही, परंतु या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अन्य पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी मुलांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे शाळा बंद असतानाही शाळेच्या शंभर टक्के मुलांचे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. पूर्व प्राथमिक ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, शालेय तसेच सहशालेय उपक्रमही ऑनलाईन सुरू आहेत. लाईव्ह एज्युकेशनला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली असून विद्यार्थ्यांचे शाळेबद्दल आकर्षण वाढले आहे. पालक-शिक्षकांची विविध उपक्रमांबाबत निखळ चर्चा होत असून शालेय प्रत्येक उपक्रम राबविण्यात यशस्वी होत आहे.
शाळेला २०२०-२१ चा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आदर्श पुरस्कारासाठी मुख्याध्यापिका ममता विचारे यांची निवड झाली आहे. एकाचवेळी दोन पुरस्कार दुग्ध-शर्करा योग असून पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.