रत्नागिरी : जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि पॅरा अॅथलेटिक्स असोसिएशनची जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डेरवण (चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जनरल चॅम्पिअनशिपची जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रत्नागिरी तालुक्याला मिळाली. यात सहभागी झालेल्या आविष्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. शाळेच्या तसेच कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी ६ सुवर्ण पदकांसह एकूण २० पदके पटकावली.
स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, लांजा येथून दिव्यांग प्रवर्गातून आठ विशेष शाळांचे आणि सर्व शिक्षा अभियानाचे विद्यार्थी अशा मिळून २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यामंदिरमधील १४ विद्यार्थी आणि शामराव भिडे कार्यशाळेच्या ९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या गुणांचे कौतुक होत आहे.
यावर्षीची जनरल चॅम्पिअनशिपची जिल्हास्तरीय व्दितीय क्रमांकाची ट्रॉफी रत्नागिरी तालुक्याला मिळाली. आविष्कार शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मानसी कांबळे, नितीन चव्हाण, रवींद्र खोबरखेडे, विद्या कोळंबेकर, संपदा शिंंदे तसेच श्री शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर, निदेशक नेहा शिवलकर, सचिन चव्हाण, विद्यार्थी मदतनीस सुनील गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे पदाधिकारी, शाळा मुख्याध्यापक, कार्यशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक, कर्मचारी व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, समाजकल्याण समिती सभापती चारुता कामतेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती ऋतुजा खांडेकर, पंचायत समिती चिपळूणच्या सभापती पूजा निकम, गटविकास अधिकारी पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
३ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य
कार्यशाळेतील साई चव्हाण (२०० मीटर धावणे - सुवर्ण, १०० मीटर धावणे रौप्य).
विद्या मोडक (१०० मीटर धावणे सुवर्ण, गोळाफेक - रौप्य).
प्रथमेश घवाळी (गोळाफेक - सुवर्ण).
आदिती बोरकर (गोळाफेक - रौप्य, १०० मीटर धावणे - कांस्य).
मनाली गवंडे (१०० मीटर धावणे - रौप्य, गोळाफेक - कांस्य).
अनिरुद्ध भोई (गोळाफेक - कांस्य).
शुभम टिकेकर (गोळाफेक - कांस्य) असे एकूण ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदक विद्यार्थ्यांनी पटकावले.
३ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य
या शाळेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी वायंगणकर (५० मीटर धावणे - रौप्य पदक, सॉफ्ट बॉल थ्रो - रौप्य पदक). जान्हवी मेढेकर (सॉफ्ट बॉल थ्रो - कांस्य पदक). ऋषिकेश साळवी (स्टँडिंग लॉँग जम्प - रौप्य पदक). श्रावणी वाघाटे (१०० मीटर धावणे तसेच गोळाफेक - सुवर्ण पदक). सोनम देसाई (गोळाफेक - कांस्य पदक). चैतन्या मुळ्ये (१०० मीटर धावणे - रौप्य पदक, गोळाफेक - सुवर्णपदक). यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी एकूण ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य पदक अशी ९ पदके पटकावली.