रत्नागिरी : तान्हुल्याचे बारसे करतात हे साऱ्यांनाच माहित आहे. किंबहुना पशुपक्ष्यांना एखादे नाव ठेवून त्यांचेही बारसे करतात. मात्र, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चक्क झाडांचेच बारसे केले आहे. तालुक्यातील वाटद - कवठेवाडी शाळेत झाडांचे बारसे ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती.गतवर्षी जुलै महिन्यात शाळेने दिलेल्या झाडाचे रोप लावायचे, त्याला स्वत:चे अथवा स्वत:च्या आवडीचे नाव द्यायचे आणि वर्षभर त्या झाडांची काळजी घेत त्याला वाढवायचे, असे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जुलै महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वितरण करण्यात आले होते.
वाटद ग्रामपंचायत आणि पालक निधीतून रोपांची खरेदी करण्यात आली होती. या रोपांची लागवड करणे आणि निगा राखण्यासंदर्भात योग्य त्या सूचना त्या- त्या वेळी शाळेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. वर्षभर असणारी झाडांची वाढ, त्यासंबंधीच्या नोंदी आणि अंतिम भेटी वेळी तज्ज्ञ परीक्षकांनी केलेल्या नोंदी यांची एकत्रित सांगड घालून निकाल जाहीर करण्यात आले.उपक्रमात विद्यार्थ्यांना दिलेल्या एकूण ३५ झाडांपैकी एक वगळता ३४ झाडे सुस्थितीत आहेत. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या श्रमनुभवासाठी सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. स्पर्धेच्या पहिल्या गटात विराज शाम आलीम, साहील विलास तांबटकर, यश पंकेश धनावडे आणि दुसऱ्या गटात आयुष भरत धनावडे, सोहम शशिकांत कुर्टे, स्वप्नील भास्कर घवाळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.