दापोली : जिल्ह्यात सर्वाधिक बाह्यरुग्ण विभाग असलेले दापोली उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे व्हावे. येथील जनतेला अधिक चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी नवीन प्रस्ताव तयार करुन ते सादर करावेत, काही दिवसांतच ते पूर्णत्त्वास जातील, असे आश्वासन दापोली - मंडणगडचे आमदार संजय कदम यांनी आज दापोलीत दिले.दापोली उपजिल्हा रुणालयाच्या कारभाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमदार कदम आज दापोलीत आले होते. तेव्हा त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रवींद्र कालेकर, खेडचे चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भेटीत छत्रपती उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करत सरपंचांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. तुषार भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत कदम म्हणाले की, जिल्ह्यामध्ये या रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असूनही रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रसुतीच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असून, इतर आजारांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून हे रुग्णालय १०० खाटांचे होणे गरजेचे आहे. रुग्णालयासाठी मी प्रयत्न करणार असून, जिल्हा नियोजनमधून अधिकाधिक निधी रुग्णालयासाठी वळवता येईल का, याचीही चाचपणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. तुषार भागवत डॉ. बाळाजी सदरे, पांडुरंग हुबाळे, हेमंत देशमुख, रिसबूड, हर्षे, हेमंत नाईक, वेदपाठक कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)औषधे नाहीत - लक्षवेधी मांडणार!रुग्णालयात आवश्यक असणारा औषधसाठा अजूनही येथील औषध भांडारात जमा झाला नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कदम यांच्या लक्षात आणून दिले. यापुढे प्रशासनाकडून वेळेवर औषधसाठा उपलब्ध होणार नसेल तर येत्या हिवाळी अधिवेशनात मी या औषधसाठ्याबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडेन, असे ते म्हणाले.
उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न सोडवणार : कदम
By admin | Published: November 25, 2014 10:21 PM