रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानासाठी सहमती दर्शविल्याने नाना यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे. मारुती आळीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून नानांची ओळख होती. मयुरा आइस्क्रीम नावाने त्यांनी आइस्क्रीम फॅक्टरीही सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेल मिनारची स्थापना केली. ते अत्यंत मनमिळाऊ आणि मिश्कील स्वभावाचे असल्याने आपल्या या व्यवसायात त्यांनी अनेक माणसे जोडली होती.वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, रत्नागिरीचे कार्यकर्ते श्रीवल्लभ (भैय्या) वणजू यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना नेत्रदानाबाबत विचारले. त्याही परिस्थितीत नानांचे चिरंजीव सुमित आणि कन्या या दोन्ही भावंडानी यासाठी होकार दर्शविला. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही याबाबत सांगितले. त्यामुळे नानांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.भैय्या वणंजू यांच्या प्रयत्नामुळे आणि संसारे कुटुंबियांच्या सहकार्यामुळे सुभाष तथा नाना संसारे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच उपस्थित असलेल्या व्यक्तींनीही डाॅक्टरांच्या परवानगीने नेत्रदान कसे होते, हे पाहिले. त्यामुळे अनेकांच्या मनातील गैरसमज दूर झाले.आपल्या वडिलांच्या नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, हे फार मोठे कार्य असल्याची प्रतिक्रिया नानांचे सुपूत्र सुमित यांनी यावेळी दिली.
नेत्रदानाबाबत अजुनही असंख्य गैरसमज आहेत. मरणोत्तर नेत्रदानासाठी समाजातून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. समाजात असंख्य अंध व्यक्ती आहेत. त्यांना नेत्रांची गरज आहे. त्यामुळे समाजात नेत्रज्ञानाबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. - श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, सामाजिक कार्यकर्ता, रत्नागिरी