रत्नागिरी : रत्नागिरी शहरात झालेल्या दोन चोऱ्यांचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या चोऱ्यांप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमित रवींद्र भोसले (२२, रा. रिंगी फाटा, खंडाळा), प्रशांत प्रकाश वीर (१९, रा. कळझोंडी, वीरवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित व्यक्ती खंडाळा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोन घरफोड्या केल्याचे कबूल केले. रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवरील मोबाइल दुकानात याच दाेघांनी चाेरी केल्याची कबुली दिली. या चाेरीतील १२ मोबाइल हॅन्डसेट, एक ब्लूटूथ ईअर फोन व रोख रक्कम १५,७०० असा एकूण १,७५,२०० इतका माल जप्त करण्यात आला आहे. तसेच शहरानजीकच्या कुवारबाव येथील दुर्गा टायर दुकान व दर्पण फोटो स्टुडिओ या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून टायर व कॅमेरा अशी मालमत्ता चोरीला गेले होते. चोरीला गेलेल्या मालापैकी ६ टायर्स आणि कॅमेरा व इतर साहित्य असा एकूण १५,८८० रुपये जप्त करण्यात आला आहे. दाेघांनी महिंद्रा कंपनीचा सप्रो मिनी ट्रक (किंमत सुमारे ४,००,०००) जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करीत आहेत.
चाफे गावचे पोलीस पाटील हिराजी तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, पोलीस नाईक रमीज शेख, पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी ही कामगिरी बजावली.