खेड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश (डोंबिवली शहर विभाग) या संस्थेने राज्यस्तरीय ऑनलाईन बालझुंबड स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगावमधील चौथीत शिकणाऱ्या श्रीमयी मकरंद दाबके हिने सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळवले.
बाल वयोगटासाठी बालझुंबड स्पर्धेत श्लोक-प्रार्थना, बालगीत व पंचतंत्रातील एक गोष्ट असे तीन स्पर्धा प्रकार घेण्यात आले. या तीनही स्पर्धा प्रकारांत श्रीमयीने सहभाग घेऊन पाठांतर, गायन व कथाकथन कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली. श्रीमयीला या स्पर्धेसाठी तिची आई पूनम दाबके व वडील मकरंद दाबके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, खजिनदार व प्रशालेच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रीमयीचे अभिनंदन केले.