रत्नागिरी : समुद्रातील खडकावर बसलेले असताना अचानक भरतीचे पाणी वाढल्याने दाेघे समुद्रातच अडकल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे मंगळवारी सायंकाळी घडली. समुद्राच्या अजस्र लाटांचे थैमान डाेळ्यांसमाेर पाहून दाेघांनाही साक्षात मृत्यूच समाेर दिसत हाेता. अखेर पाेलिसांकडे मदतीचा फाेन करताच, पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून दाेघांना सुखरूपपणे बाहेर काढले.रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला मंगळवारी सायंकाळी एक युवक आणि युवती गेले हाेते. तेथील एका खडकावर बसून दाेघे समुद्रातील पाण्याचा आनंद घेत हाेते. त्याचदरम्यान समुद्राला भरती आली आणि समुद्राचे पाणी वाढले. ते दाेघे ज्या ठिकाणी बसले हाेते, त्याच्या चहूबाजूला भरतीच्या पाण्याने वेढा घातला. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या. या अजस्र लाटा खडकावरही आदळू लागल्याने दाेघे घाबरून गेले. समुद्राचे पाणी अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आणि दाेघांना समाेर साक्षात आपला मृत्यूच दिसू लागला.जीवघेण्या प्रसंगात काय करावे, याचा विचार करीत असताना अखेर युवकाने शहर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, शहर पाेलिस स्थानकातील अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अजस्र लाटांमध्ये या दाेघांना वाचविण्यात अडचणी येत होत्या. त्याच वेळी तिथे मासेमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुड्ये हे दाेघे तरुण देवदूत बनून आले. जिवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाेघांना सुखरूपपणे बाहेर काढले. जिवाची सुटका होताच, त्या दाेघांनी तरुणांचे पाय धरत त्यांचे आभार मानले.
दोघेही शिक्षणासाठी रत्नागिरीतमृत्यूच्या दाढेत अडकलेला युवक अमरावती येथील असून, युवती जळगाव येथे राहणारी आहे. हे दाेघेही रत्नागिरीत शिक्षणासाठी आले असून, रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनेनंतर दाेघेही घाबरून गेले हाेते. या दाेघांना पाेलिसांच्या मदतीने सुखरूपपणे घरी साेडण्यात आले.