शाश्वत शेती करा
रत्नागिरी : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतर हंगामी शेतीत नवनवीन प्रयोग करून शाश्वत शेती केली पाहिजे, असे आवाहन पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत यांनी केली. वळके ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात त्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण सावंत, कृषी सहायक सुनील कुरंगळ उपस्थित होते.
ऑनलाईन प्रशिक्षण
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या टूर गाईडविषयक ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ७०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणात अजूनही सहभागाची संधी उपलब्ध असून, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर
मंडणगड : मंडणगड तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मुबीन परकार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ४१ रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटन माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मुजफर मुकादम, भाई पोस्टुरे उपस्थित होते.
लसीकरणाची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीचा तुटवडा भासत असून, शहरामध्ये ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मोजके डोस पाठविले जात असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याची मागणी होत आहे.