रत्नागिरी : येथील सुप्रिया नंदकुमार सावंत यांनी एलएलबी परीक्षेत यश मिळविले आहे. ४५ व्या वर्षी त्यांनी ही पदवी संपादन केली आहे. सामाजिक कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. संपर्क युनिक फाउंडेशनच्या महिला संघटक म्हणून त्या काम पाहत आहेत.
ओबीसी संघर्ष समिती बैठक
रत्नागिरी : ओबीसी संघर्ष समितीची बैठक २१ ऑगस्ट रोजी वाटद येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता वाटद जिल्हा परिषद गटाची बैठक खंडाळा येथे होणार आहे. तसेच ४ वाजता रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही बैठक होणार आहे.
फेरी बोटीची चाचणी
गुहागर : तालुक्यातील परचुरी आणि दापोली तालुक्याला जोडणाऱ्या फेरीबोटीची चाचणी यशस्वी झाली आहे. या फेरीबोटीमुळे हे दोन्ही तालुके जोडले जाणार आहेत. तसेच मुंबई अंतरदेखील कमी होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि खर्च यांची बचत होणार असल्याने या फेरीबोटीला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
रस्ता खड्डेमय
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे काजिरभाटी ते बाजारपेठ हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरून गणपतीपुळेकडे जाणारी वाहतूक सदैव सुरू असते. परंतु खड्डे असल्याने प्रवास त्रासदायक होत आहे.
कॉल ड्रॉप
रत्नागिरी : बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असतानाच आता होणाऱ्या कॉल ड्रॉपमुळे ग्राहकही हैराण झाले आहेत. बीएसएनएलवरून कॉल करताना सुरुवातीला कॉल ड्रॉप होत आहेत. त्याचबरोबर फोन न लागणे ही समस्याही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सतावत आहे.