सर्वेक्षण पूर्ण
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. गावातील सहा पथकांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात सुरू असलेले हे अभियान कनकाडी गावात सुरू होते. सहा पथकांनी फिरून गावातील सर्व बारा वाड्या पिंजून काढल्या.
निकाल लांबणीवर
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या निर्बंधाचा सर्वात मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक परीक्षा पूर्ण झाल्या तरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम अर्धवट राहत असल्याने निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सात फेऱ्या रद्द
रत्नागिरी : तिरूनवेल्ली-जामनगर एक्स्प्रेस, वास्को द गामा ते कोलम, कोलम ते वास्को द गामा, वास्को द गामा यशवंतपूर, यशवंतपूर- वास्को द गामा, ओखा एर्नाकुलम या कोकण रेल्वे मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वादळामुळे केरळमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
साहित्य वाटप
दापोली : उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या शेडमध्ये आसरा घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना पंखे व मच्छर अगरबत्ती आदी वस्तू येथील श्री आदर्श मित्रमंडळाच्या सदस्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी डीसीएचसी सेंटर उभारण्यात आले आहे.
कोरोना केंद्राला मदत
लांजा : तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देवधे येथील शासकीय कोरोना केंद्राला पिण्याचे पाणी गरम करण्याचे उपकरणे भेट देण्यात आली आहेत. कोरोना केंद्रातील दाखल रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविण्यात आला.
चोरवणेत जनजागृती
देवरूख : येथून जवळच असलेल्या चोरवणे गावचे सरपंच दिनेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित व सुदृढ रहाव यासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. गावातूनन बाहेर जाणाऱ्या व गावात येणाऱ्या व्यक्तींची रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय साहित्याची भेट
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक औषधे व आरोग्यविषयक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. महागड्या गोळ्यांचा गरजूंना लाभ मिळावा यासाठी मंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
नौकांना आंजर्ले खाडीत आसरा
दापोली : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आंजर्ले खाडीत अनेक नौकांनी आसरा घेतला आहे. दाभोळ वगळता उत्तरेच्या बाजूला एकाही किनाऱ्याला जेटी नाही. यामुळे चक्रीवादळ आलेनंतर केळशी, उटंबर, आडे, हर्णे, आंजर्ले, बुरोंडी आदी समुद्र किनाऱ्यावरील नौकांना सुरक्षेसाठी आंजर्ले खाडीचा आसरा घेतला आहे.
आज रक्तदान शिबिर
खेड : एक सामाजिक कार्य संस्था व रत्नागिरी चिकित्सालय रक्तसाठी केंद्रातर्फे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मागासवर्गीय समाज मंदिरात होणार आहे. इच्छुकांनी दयानंद कासारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.