रत्नागिरी : सागरी सुरक्षिततेसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज झाला असून गुरूवारी या विमानतळावरून तटरक्षक दलाचे विमान यशस्वीपणे खाली उतरले आणि झेपावलेही. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी चाफेकर, पीटीएम, टीएम यांनी आज डॉर्नियर विमानाने चाचणी दौरा केला.
यादरम्यान केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. हे काम सध्या पूर्ण झालेले असून त्यावर चाचणी उड्डाणे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सागरी गस्तीसाठी तटरक्षक दलाची विमाने व हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळ येथून नियमित भरारी घेतील. आजचे उड्डाण हे प्रथम चाचणी उड्डाण असल्यामुळे त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाय योजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती येथे उभारले जाणारे जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाटे येथे उभारले जाणारे होवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण आदि सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱ्या पायाभूत विकास कामे यांबद्दल कमांडंट पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.
चाफेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाटे बीच येथील तटरक्षक दलाच्या भूखंडांवर जाऊन त्यांना आगामी काळात सुरु होणाऱ्या प्रकल्पाचीही माहितीही यावेळी देण्यात आली.