रत्नागिरी : देवाच्या समोरील भक्त एकसमान आहेत. तेथे श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही. देवाचा महाप्रसाद शिजवतानादेखील ठराविक श्रीमंतांकडून पैसे न घेता घरपट शिधा गोळा केला जाते. गेली ३६ वर्षे ही परंपरा अखंड सुरू असून, दरवर्षी २५०० ते ३००० भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात.श्री कालभैरव जयंती दि. १४ रोजी असून, दरवर्षी श्रीदेव भैरव मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात गेल्या ३६ वर्षांपासून ‘ग्रामशांती यज्ञ महाप्रसादा’चे आयोजन करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी केवळ ठराविक श्रीमंत किंवा दानशुरांकडून देणगी गोळा केली जात नाही. त्यासाठी मांडवी गावातील प्रत्येक घरातून शिधा गोळा करण्यात येते. गावात २५० घरे आहेत. प्रत्येक घरातून यज्ञासाठी २५ रूपये इतकी नाममात्र रक्कम गोळा करण्यात येते, तर महाप्रसादासाठी शिधा जमवण्यात येतो.विशेष म्हणजे मांडवीतील नागरिक यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे सढळ हस्ते मदत करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिधा जमतो. कालभैरव जयंतीदिनी महाप्रसादासाठी भक्तांची एकच गर्दी लोटते.प्रत्येक घरातून तांदूळ, बटाटे, गोडेतेल, कच्चे टोमॅटो, पावटे, तूरडाळ, मसाला, गूळ, नारळ किंवा सुके खोबरे गोळा केले जाते. महाप्रसादाच्या एक दिवस आधी सर्व वस्तूंचे संकलन केले जाते. संकलित केलेल्या शिधामध्ये भात, वरण, टोमॅटो व बटाटा घालून रसभाजी, गूळ खोबऱ्याचे पुरण व लोणचे असे सुग्रास भोजन शिजविण्यात येते. महाप्रसादासाठी मांडवीबरोबर शहर परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. महाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेत जर कमी पडले तर मात्र उत्सव मंडळ अन्य लागणाऱ्या वस्तू विकत आणते. श्रीदेव भैरव मंदिर शांती यज्ञ व महाप्रसाद उत्सव मंडळातर्फे दरवर्षी कालभैरव जयंतीचे औचित्य साधून यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंडळातर्फे महाप्रसादाला येणाऱ्या भाविकांना अगत्याने वाढले जाते. इतकेच नव्हे; तर वाडीतील एखाद्या घरातील व्यक्ती आजारी असेल तर द्रोणातून महाप्रसाद देण्यात येतो.
भक्तीपोटी मांडवीकरांचा ३६ वर्षे अन्नदानाचा यशस्वी प्रयोग
By admin | Published: November 14, 2014 12:19 AM